Thursday, 21 July 2016

काय केले देवराया , पाठी लावलीस माया ...!!!

ब्रम्ह हे ज्ञानमय आहे . ब्रम्हाला स्वत्वाची जाणीव झाली म्हणजे तो ईश्वर होतो . ईश्वर म्हणजे सगुण मुर्त ब्रम्ह आहे . ईश्वर निराकार आहे पण सर्व आकार त्याच्या पासुनच दृष्यामधे अवतरतात , विश्वातील सार्या घटना त्याच्या सत्तेने घडतात , कालचक त्याच्या संमतीनेच फिरते , तोच विश्वाचा जनक व संरक्षक आहे ......!!!
       " मी एक आहे , मी अनेक व्हावे " ईश्वराच्या या संकल्पातच पुर्ण विश्वाचे बीज असते . ईश्वराच्या या सुक्ष्म , दिव्य संकल्पास हिरण्यगर्भ म्हणतात . हिरण्यगर्भ ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे . सुक्ष्म पंचमहाभुते , वासना घेऊन राहणारे अनेक जीव , मृत्युने अदृष्यात नेलेले अनंत जीवांचे सुक्ष्मदेह , भविष्य कालीन घटना ईत्यादी सर्व हिरण्यगर्भात अव्यक्त पणे वास करतात  हिरण्यगर्भ हे दृष्य विश्वाचे अदृष्य बीज आहे . पुर्ण विश्वाचे भुत , भविष्य व वर्तमान येथेच नियोजीत होते ...!!!
         नामरूपांनी भरलेले आणि कर्ममय असलेले दृष्य विश्व म्हणजे ब्रम्हांड होय . ईश्वराचा आनंद उसळून येतो तेंव्हा तो आनंद विश्वाचे मुलद्रव्य होतो या आनंदातुनच अनंत रूपांनी ब्रम्हांड म्हणजेच दृष्य विश्व साकार होते . सचेतन व अचेतन वस्तुंची गर्दी असलेले हे ब्रम्हांड माणसाच्या इंद्रियांना खरे पणाने दिसते पण ते पुर्णपणे खरे नाही . मुळ हिरण्यगर्भावर ते अवलंबुन असते ...!!!
        ईश्वर संकल्प करतो , हिरण्यगर्भ निर्माण करुन त्याचे पालनपोषण करतो व ब्रम्हांड कर्ममय जीवन जगते . हे दृष्य विश्व पुर्ण पणे सत्य नाही . विश्व दुःखमय आहे ही संकल्पना उपनिषदांमधे नाही ...!!!
       अनंत जीवांना अव्यक्तातुन व्यक्तात आणणारी आणि दृष्यात गुंतवुन ठेवणारी जी शक्ती आहे तिला  " माया " असे म्हणतात .  कोणतीही शक्ती स्वतंत्र पणे राहु शकत नाही , तिला तुल्यबळ असे अधिष्ठान लागते . ईश्वर हेच मायेचे अधिष्ठान आहे . निर्गुण ब्रम्ह आणि हिरण्यगर्भ यांच्या दरम्यान मायेला सांभळणारा व आवरणारा ईश्वरच आहे . ईश्वरालाच सगुण ब्रम्ह असे म्हणतात . माया ही जबरदस्त खरी पण कुणाला ? ज्याने ईश्वराला सोडले त्याला ...!!!
दृष्य पणाने प्रकट होणे हा मायेचा स्वभाव आहे . माणसाची इंद्रिये ,मन , बुध्दि हे सर्व दृष्याचा भाग आहेत ...!!!
      जगातील साकार वस्तु मधुन निराकार आत्मस्वरूपाचेच सौंदर्य डोकावत असते . आत्म्याच्या या निराकार , अतिंद्रिय सौंदर्या सारखे या दृष्य जगात काहीही नाही ...!!!
  " न तस्य प्रतिमा अस्ति "

No comments:

Post a Comment