Thursday, 21 July 2016

काय केले देवराया , पाठी लावलीस माया ...!!!

ब्रम्ह हे ज्ञानमय आहे . ब्रम्हाला स्वत्वाची जाणीव झाली म्हणजे तो ईश्वर होतो . ईश्वर म्हणजे सगुण मुर्त ब्रम्ह आहे . ईश्वर निराकार आहे पण सर्व आकार त्याच्या पासुनच दृष्यामधे अवतरतात , विश्वातील सार्या घटना त्याच्या सत्तेने घडतात , कालचक त्याच्या संमतीनेच फिरते , तोच विश्वाचा जनक व संरक्षक आहे ......!!!
       " मी एक आहे , मी अनेक व्हावे " ईश्वराच्या या संकल्पातच पुर्ण विश्वाचे बीज असते . ईश्वराच्या या सुक्ष्म , दिव्य संकल्पास हिरण्यगर्भ म्हणतात . हिरण्यगर्भ ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे . सुक्ष्म पंचमहाभुते , वासना घेऊन राहणारे अनेक जीव , मृत्युने अदृष्यात नेलेले अनंत जीवांचे सुक्ष्मदेह , भविष्य कालीन घटना ईत्यादी सर्व हिरण्यगर्भात अव्यक्त पणे वास करतात  हिरण्यगर्भ हे दृष्य विश्वाचे अदृष्य बीज आहे . पुर्ण विश्वाचे भुत , भविष्य व वर्तमान येथेच नियोजीत होते ...!!!
         नामरूपांनी भरलेले आणि कर्ममय असलेले दृष्य विश्व म्हणजे ब्रम्हांड होय . ईश्वराचा आनंद उसळून येतो तेंव्हा तो आनंद विश्वाचे मुलद्रव्य होतो या आनंदातुनच अनंत रूपांनी ब्रम्हांड म्हणजेच दृष्य विश्व साकार होते . सचेतन व अचेतन वस्तुंची गर्दी असलेले हे ब्रम्हांड माणसाच्या इंद्रियांना खरे पणाने दिसते पण ते पुर्णपणे खरे नाही . मुळ हिरण्यगर्भावर ते अवलंबुन असते ...!!!
        ईश्वर संकल्प करतो , हिरण्यगर्भ निर्माण करुन त्याचे पालनपोषण करतो व ब्रम्हांड कर्ममय जीवन जगते . हे दृष्य विश्व पुर्ण पणे सत्य नाही . विश्व दुःखमय आहे ही संकल्पना उपनिषदांमधे नाही ...!!!
       अनंत जीवांना अव्यक्तातुन व्यक्तात आणणारी आणि दृष्यात गुंतवुन ठेवणारी जी शक्ती आहे तिला  " माया " असे म्हणतात .  कोणतीही शक्ती स्वतंत्र पणे राहु शकत नाही , तिला तुल्यबळ असे अधिष्ठान लागते . ईश्वर हेच मायेचे अधिष्ठान आहे . निर्गुण ब्रम्ह आणि हिरण्यगर्भ यांच्या दरम्यान मायेला सांभळणारा व आवरणारा ईश्वरच आहे . ईश्वरालाच सगुण ब्रम्ह असे म्हणतात . माया ही जबरदस्त खरी पण कुणाला ? ज्याने ईश्वराला सोडले त्याला ...!!!
दृष्य पणाने प्रकट होणे हा मायेचा स्वभाव आहे . माणसाची इंद्रिये ,मन , बुध्दि हे सर्व दृष्याचा भाग आहेत ...!!!
      जगातील साकार वस्तु मधुन निराकार आत्मस्वरूपाचेच सौंदर्य डोकावत असते . आत्म्याच्या या निराकार , अतिंद्रिय सौंदर्या सारखे या दृष्य जगात काहीही नाही ...!!!
  " न तस्य प्रतिमा अस्ति "

असतो मा सत्गमय ...

हे दृष्य व अवाढव्य विश्व ज्याच्या पासुन निर्माण झाले , ज्याच्या मुळे व ज्याच्या मध्ये ते जगते व अखेर ज्याच्यातच लीन होते असे मुळ तत्व कोणते ? याचा शोध ऋषी मुनी जन्मभर करत राहिले , ध्यान खोल गेल्यावर अखेर अंतर्यामी आत्मस्वरूपाने स्फुरणार्या स्वयंप्रकाशी चैतन्याचा साक्षात्कार त्यांना झाला .
विश्वाला गतिमान ठेवणारे आणि सजीवांना जीवंत ठेवणारे चैतन्य मुळात एकरूपच आहे असा अनुभव ऋषींना आला .
सर्व विश्वाला अंतर्यामीपणे व्यापणार्या या चैतन्याला " ब्रम्ह " असे म्हणतात . तेच सत्याचे सत्य आहे , तेच शुद्ध अस्तित्व आहे . ब्रम्ह आहे म्हणून सर्व काही आहे .
ब्राह्म अमुक एक नसुन सर्व काही आहे . जेंव्हा काही नव्हते तेंव्हा ब्रम्ह होते , सध्या ही आहे पण जेंव्हा काहीही नाही असे होईल तेंव्हा ही  ब्रम्ह जसेच्या तसे असेल ...!!!
      कोणतीही मानवी कल्पना तिथपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून मौन हेच त्याचे सर्वोत्तम वर्णन होय ...!!!
ब्रम्ह कशासारखेच नाही पण कशाहुन वेगळे ही नाही , दृष्य नाही तसे अदृष्य ही नाही . तरी ते शुन्य आहे असे मात्र नाही .
त्याला आरंभ ही नाही व अंत ही नाही , ते वाढत नाही व घटतही नाही , ते अमुक एक वस्तु आहे असे नाही पण ते जिच्या पोटात नाही अशी वस्तु च नाही ....!!!
ते अनादी अनंत एवढेच आपण म्हणु शकतो ...!!!

ॐ पुर्णमद: पुर्णमिदं , पुर्णात्पुर्णमुदच्यते ।
पुर्णस्य पुर्णमादाय पुर्णमेवाव शिष्यते ।।

" ॐ शांती : शांती शांती ..."

Wednesday, 20 July 2016

उपनिषदे काय सांगतात ...???

काळ अखंड पणे वाहत असतो . काळ जसा पुढे जातो तसे मानवी जीवन बदलते . सामाजिक जीवनात नवीन पणा आला म्हणजे माणसाचे खाणे पिणे , कपडेलत्ते , घरदार , यंत्र व वाहने यात बदल होतो तरीही माणसाचे मुळ स्वरूप म्हणजे अंतरंग तेच राहते . माणसाच्या वासना , आशा आकांक्षा , सुखदुःख , राग द्वेष यामध्ये युगानुयुगे फरक पडत नाही . याचा परिणाम असा होता की जीवना संबंधित काही चिरंजीव प्रश्न सर्व काळी सर्व ठिकाणी माणसाच्या मनाला उत्तर शोधण्यासाठी टोचणी देत राहतात ...!!!
१} माणसाचे खरे समाधान कशात आहे ?
२} जीवनात नशीब व प्रयत्नाचा भाग किती ?
३}चांगले काय माहीत असुनही माणूस वाईटाच्या मागे का लागतो ?
४}मृत्युनंतर माणसाचे जीवन आहे का ?
५}विश्व का , कसे व कुणी निर्माण केले ?
६}अमरत्व कशाने मिळेल ?
७} मानवाचे अंतिम ध्येय काय ?
८} सर्वोत्तम आनंद कोणता ?
९} विश्वाचे मुलद्रव्य कोणते?
१०} जीवंतपणी मुक्तावस्था येते का ?
       हे प्रश्न अनादीकाळा पासून मानवी मनाला बोचकारत आले आहेत . माणूस , जगत आणि ईश्वर यांचे मुलस्वरूप आणि परस्पर संबंध असताना हे प्रश्न का उभे राहतात ?
माणूस बुध्दिमान प्राणी असल्याने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी माणसाचीच आहे ...!!!
       उपनिषदकार ऋषींनी या सर्व प्रश्नांची समाधान कारक उकल केल्याचे आढळते ...!!!

Saturday, 2 July 2016

* बळीराजा व्यवहारी हो *


===============
पगार वाढ होऊद्या भरघोस त्यांची , आमची काहीच हरकत नाही ,
का वाढताहेत आमच्या आत्महत्या दिवसेंदिवस ? या कडे जरा डोळे उघडून पाही ...!!!

टनात काटा मारलेल्या आमच्या ऊसाची साखर , तिकडे ग्रॅमात तोलली जाते ...
    मेजवान्या झडतात यांच्या , आमच्या हाती मात्र पिठलं-भाकर येते ...!!!

दर दसर्याला यांच्या दारी , कोरी गाडी ऊभी राहते ,
आमची दिवाळी मात्र ,
दुभती गाय बाजारात घालवुनच होते ...!!!

   पोरं शिकतात तुमची देऊन खोका आणि पेट्या ,
आमच्या सात-बार्यावर असतो ,
भुविकास बँकेचा सोट्या ...!!!

जय जवान जय किसान बोलुन , पोटं यांची भरतात , प्रत्यक्षात जवान किसान, दारिद्र्यातच मरतात ...!!!

उदो उदो थांबवून यांचा आता , व्यवहारी हो बळीराजा , पुढच्या पिढ्यांना नाहीतर मिळेल , याची मोठी सजा ...!!!

-
रविन्द्र किसनराव झांबरे
होळकरवाडी ,पुणे

Thursday, 30 June 2016

खास आवडले असे ...लेखक - अनामिक

बो ल, काय म्हणावे तुला?
यार? दोस्त? अझीझ?
की आणखी गळ्यात पडून
म्हणू : भाईजाऽऽन?
...की आणखी काही?
असे वाटते की,
पसरावेत दोन्ही हात आणि
म्हणावे तुला, मेरे यार, मेरे हम नफस,
हम नवॉं, मेरे हमदम, मेरे दोस्त...
मारावी कडकडून मिठी,
चिंतावे थोडे वा बहुत
अभीष्ट तुझ्या वृद्धी
आणि शानो-शौकतसाठी.
किंवा गेलाबाजार,
टाकावा सहजच हात
तुझ्या खांद्यावर,
विचारावे कुशलमंगल,
द्यावी बधाई किंवा सौगात.
अगदीच नाही जमले तर
किमान तुझा शीतोष्ण पंजा
घ्यावा ऊबदार हातात.
द्यावे स्वत:लाच एक
(फ्रेम करण्याजोगे) प्रशस्तिपत्र
बेजोड दोस्तदारीचे.
की-
हासडावी एखादी इरसाल शिवी
मनातल्या मनात?
आणि दातओठ खात
घुसवावीत वाघनखे,
जमतील तितकी खोल,
तुझ्या आंतड्यात?
खुपसावा निर्णायक खंजीर
थेट तुझ्या उलट्या काळजात,
आणि करावा शेवट
साऱ्याचा...एकदाचा?
उधळून लावाव्यात तुझ्या
राहुट्या, कापून न्यावेत
त्यांचे सुनहरे कळस?
भरडून काढावे तुला
तोफगोळ्यांच्या भडिमारात
जागोजाग पेरावेत सुरुंग
आणि धुळीस मिळवावेत,
तुझे सारेच नापाक मनसुबे
उभारावी अशी बुलंद दीवार
सरहद्दीच्या या टोकापासून
त्या टोकापर्यंत की,
एव्हरेस्टलाही पछाडावे
खुजेपणाच्या न्यूनगंडाने.
पाडावा (कृत्रिम) पाऊस
रक्ताचा इथे...आणि तिथेही?
कारण-
बघितले आहे अनेकवार,
तुझ्या कोरीव पठाणी दाढीत
दडलेले घातक छद्म.
हस्तांदोलनाच्या वेळी
तुझ्या मस्तकावरली
तडतडणारी शीर.
तुझ्या बेजोड इस्तकबालात,
आणि बेमिसाल दावतीच्या
गर्दीत फिरणाऱ्या
गारद्यांच्या भयंकर सावल्या.
दोस्तान्याच्या बैठकीत
सौहार्दाच्या पडद्याआड
नंग्या तलवारीसह
दडलेला सैयद बंडा!
तुझ्या दुश्मनीला आहे,
दोस्तीचा दर्प, आणि
दोस्तीत दर्वळतो आहे,
दुश्मनीचा दुर्गंध
...अगदी एकाच वेळी.
मग आम्ही कसा बरे
करावा तुझा एतबार, ऐ दुश्मन?
कशी मारावी संभावित मिठी,
आणि द्यावे आमचे भवितव्य
अभाविताच्या कपटी हातांत?
कसे रचावेत कसीदे
यारीचे आणि ईमानदारीचे?
कशी करावी नुमाईश
आमच्या बेखौफ जिंदगीची.
कशी द्यावी मिसाल,
निहायत खूबसूरत भाईचाऱ्याची?
चलो, तो इक करार करते हैं...
जब तक है भरोसा तेरे दुश्मनीपर
दोस्ती का करेंगे इकरार
जब तक है यकीन तेरे दोस्तदारीपर
दुश्मनी का करेंगे एतबार...
अमन नाम की भी तो कोई
चीडिया होती है ना,
मेरे अझीझ दुश्मन!☜☜☜

Monday, 20 June 2016

शिवसेना , काल , आज आणि उद्या ही ......!!!!

शिवसेना ५० वर्षाची झाली , सुवर्ण महोत्सव साजरा झाला ...!!!
प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने आणि जीवलगांच्या साथीने बाळासाहेबांनी कार्यारंभ केला ...!!!
ऐन उमेदीच्या काळात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात निष्ठावंत अशी  जवळजवळ अख्खी एक पिढीच निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये ...!!!
हाच शिवसेनेचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि राहिल ...!!!
मधल्या काळात  अनेक स्थित्यंतरे ,उलथापालथ झाली ,यातुन शिवसेना ताऊन सुलाखून निघाली आणि अधिक मजबूतीने उभी राहीली ....!!!
    याला कारण हा मजबूत आधार स्तंभ आहे आणि असा आधारस्तंभ दुसर्या कुण्या नेत्याला लाभला आहे असे किमान माझ्या तरी माहिती मधे नाही ...!!!
        
महाराष्ट्र 1 वर आजचा सवाल मधील विचारवंतांच्या चर्चेत शिवसेन�चा वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी बराच उहापोह झाला ....!!!
सेनेचा भविष्य काळही अधिक उज्वल असेल असे सर्वांना वाटत आहे ....!!!
शिवसेना उभी आहे ती शिवसैनिकांच्या बळावर ,कुण्या नेत्याच्या पैशावर वा गल्लाभरू कार्यकर्त्याच्या जोरावर नव्हे ...!!!
शिवसैनिक हेच शिवसेनेचे प्राण आहेत आणि ते वगळता सेना असु शकत नाही ...!!!
बाळासाहेबांच्या विचारांना आणि संघटनेला कोटीकोटी प्रणाम आणि शुभेच्छा ...!!!
जय महाराष्ट्र ...!!!
❤❤❤❤❤
_
रवि॑द्र किसनराव झांबरे पाटील

Wednesday, 27 January 2016

"बाळासाहेबांचे पहीले दर्शन" काळ ८८/८९ माझे वय असेल साधारण १७/१८ होळकरवाडी ते अण्णासाहेब मगर काँलेज हडपसर रोजचा आठ किमी प्रवास सायकलने त्यादिवशी गाडीतळ मैदान(आता तेथे बस डेपो आहे) वर मोठा स्टेज उभारलेला पाहीला पूर्ण परीसर भगवामय झाला होता ! चौकशी केल्यावर समजले बाळासाहेब ठाकरे येणार आहेत सभेसाठी तोपर्यंत फक्त साहेबांविषयी ऐकून होतो आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग येणार म्हणून आनंदित झालो ! काँलेज ला दांडी मारूण दिवसभर मित्रांबरोबर तिथे कार्यकर्त्याच्यात सामील होऊन प्रथमच भगवा ध्वज हाती घेतला (पूढे तो परमप्रिय होऊन गेला ) साहेबांचे आगमन सायं. ५वा. होणार म्हणुन आम्ही भगवा हातात घेऊन सर्वात पूढची जागा पकडुन त्यांच्या स्वागतास सज्ज झालो ! तोपर्यंत ईतर नेत्यांची भाषणे चालू होती आमचे लक्ष मात्र साहेबांच्या वाटेवर ! अलोट जनसागर जमला होता घोषणा चालू होत्या आमच्यसाठी हे सर्व नवीन होते ! ईतक्यात बाहेर फटाक्यांचा आवाज़ आला घोषणाचा आवेश वाढला ! अशा आतिशबाजीतच साहेब व्यासपीठावर दाखल झाले ! ते त्यांचे प्रथम दर्शन ! निरव शांतता सर्व काही थांबल्याचा भास मन शून्यावस्थेत ! आणि मनाचा ताबा त्यांच्याकडे ! भारावणे म्हणजे काय त्याची प्रचिती ! एकावेळी ईतके संमोहित होऊ शकतात ? पूढची फटके बाजी टोलेबाजी ठिणग्या निखारे मी कसे वर्णन करणार ?